विविध मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा-आरती व स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
बुलढाणा (Buldhana update/सुरेश फिस्के) : रुद्राभिषेक दिनानिमित्त शिवपार्वती महिला मंडळ व महाराष्ट्र वीरशैव सभा, शाखा बुलढाणा यांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये महिला मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. महिलांनी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेत रुद्राभिषेक, पूजा व आरती केली. बुलढाणा येथील संभाजीनगर परिसरातील शिवमंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करून पूजा व आरती करण्यात आली. तसेच बुलढाणा येथील चैतन्यवाडी परिसरातील शिवमंदिरात जाऊन मंदिराची स्वच्छता करण्यात आली आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. बिरसिंगपूर येथील कालभैरव मंदिर परिसरातही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांना महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई फिसके तसेच डॉक्टर सुरेखाताई जतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपाध्यक्षा, कार्याध्यक्षा, सचिव तसेच महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. धार्मिक श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड देत स्वच्छता, एकजूट आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा हा उपक्रम आनंददायी व यशस्वी ठरला.






