वर्षभर प्रस्ताव प्रलंबित; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशीसह कारवाईची मागणी
साखरखेर्डा (बुलढाणा अपडेट / असलम अंजुम) : सिंदखेड राजा तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तसेच सुनावणी पूर्ण झाल्यानंतरही जन्म-मृत्यू नोंदणीचे शेकडो प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप साखरखेर्डा येथील माजी उपसरपंच, पत्रकार तथा जिल्हा शांतता समितीचे सदस्य असलम अंजुम यांनी केला आहे. तहसीलदार अजित दिवटे यांच्या कथित हस्तकांमार्फत प्रति प्रस्ताव ५ ते ८ हजार रुपयांची लाच मागितली जात असून, रक्कम न दिल्यामुळे प्रस्ताव जाणूनबुजून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी अंजुम यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, ऑक्टोबर व डिसेंबर २०२५मध्ये तहसीलदारांची भेट घेऊन प्रलंबित प्रस्तावांची यादी देण्यात आली होती. संबंधित लिपिकांशी संपर्क साधून आवश्यक त्रुटींची पूर्तताही करण्यात आली; मात्र अनेक प्रस्तावांवर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. पैसे देणाऱ्यांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जात असल्याचा, तर पैसे न देणाऱ्या नागरिकांचे प्रस्ताव सुनावणी पूर्ण होऊनही अडकवून ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासकीय कामात होणाऱ्या विलंबाबाबतच्या कायद्याच्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच वर्षभरापासून प्रलंबित असलेले प्रस्ताव व त्यांचे रेकॉर्ड नागरिकांना पुढील प्रक्रियेसाठी तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अंजुम यांनी केली आहे. या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्यता समोर आणावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.






