मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष देवेंद्र आखाडे यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण चर्चेत आले आहे. डोणगाव बसस्थानक परिसरातील वादग्रस्त अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या काही काळापासून ऐरणीवर होता. संबंधित अतिक्रमण हटविण्याबाबत आदेश होऊनही प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता. तसेच अतिक्रमणधारकाला पाठीशी घातले जात असल्याचाही आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी देवेंद्र आखाडे यांनी तक्रार करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, पंचायत समिती मेहकरच्या निलंबन आदेशात ग्रामपंचायतीचे कामकाज नियमानुसार न करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे तसेच ग्रामपंचायतीच्या करवसुलीच्या रकमेसंदर्भातील व्यवहारांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या चौकशी अहवालासह कारणे दाखवा नोटिशीचाही आदेशात संदर्भ देण्यात आला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ३ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील संबंधित तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. तथापि, बसस्थानकावरील अतिक्रमण प्रकरण हेच निलंबनाचे एकमेव किंवा थेट कारण असल्याचे आदेशातून स्पष्ट होत नसल्याने या दोन्ही बाबी स्वतंत्रपणे पाहणे आवश्यक आहे. दरम्यान, बसस्थानकावरील अतिक्रमणाबाबत नेमके कोणते आदेश देण्यात आले होते, त्यांची अंमलबजावणी का झाली नाही आणि यासंदर्भात कोणाची जबाबदारी होती, याची स्पष्ट चौकशी करून नियमानुसार पुढील कारवाई करावी, तसेच सक्षम प्राधिकरणाच्या आदेशानुसार सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करावी, अशी मागणी देवेंद्र आखाडे यांनी केली आहे. शासकीय आदेशांची वेळेत अंमलबजावणी, सार्वजनिक जागांचे संरक्षण आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे पारदर्शक कामकाज यांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासकीय आदेश केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलात यावेत आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर प्रशासनाची जबाबदारी निश्चित व्हावी, अशी भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष देवेंद्र आखाडे यांनी मांडली आहे.






