रोज कंटेनर येतात, साठे होतात आणि माल निघून जातो; मग यंत्रणेला दिसत नाही का? जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे का?
डोणगाव : डोणगाव परिसरात रस्त्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात चाऱ्यासदृश मालाचे साठे करून ठेवलेले असताना रात्रीच्या अंधारात कंटेनरमधून हा माल नियमितपणे बाहेर नेला जात असल्याचा आरोप समोर येत आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक एक-दोन दिवसांची नसून रोज सुरू असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. एकीकडे मेहकर तहसील कार्यालयाने अवैध चारा वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करून संबंधित यंत्रणांना कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत, तर दुसरीकडे डोणगावात रस्त्याच्या कडेला एवढ्या मोठ्या प्रमाणात साठे उघड्यावर पडलेले असताना प्रशासनाची नजर नेमकी कुठे आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. तहसील कार्यालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करून दैनिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मग डोणगावात रोज रात्री होणारी ही कथित वाहतूक प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही का? की सर्व काही डोळ्यांसमोर घडत असतानाही जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे? असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यालगत शेतात मोठमोठे साठे, रात्रीच्या वेळी कंटेनरची ये-जा आणि त्यानंतर माल बाहेर नेला जात असल्याची चर्चा सुरू असताना संबंधित विभागाने केवळ कागदी आदेश काढून थांबायचे की प्रत्यक्ष मैदानात उतरून तपासणी करायची, हा प्रश्न आहे. भरारी पथके नेमली असतील तर त्यांनी आतापर्यंत किती तपासण्या केल्या? किती वाहने तपासली? किती साठ्यांची चौकशी केली? आणि किती कारवाया केल्या? याचा हिशेब जनतेसमोर येणे गरजेचे आहे. या संपूर्ण प्रकाराची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून साठ्याचा स्रोत, मालकी, वाहतुकीची कागदपत्रे आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या कंटेनर वाहतुकीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. शासनाचा आदेश स्पष्ट असताना डोणगावातील ही कथित वाहतूक सुरूच असेल, तर प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का, याचा खुलासा आता प्रशासनानेच करावा!






