बॅनर कोसळून मोठा अनर्थ घडला असता; परवानगी देतो कोण, जबाबदारी घेणार कोण?
बुलढाणा अपडेट / डोणगाव : डोणगाव बसस्थानकासमोर रस्त्यालगत लावण्यात आलेला बॅनर कोसळल्याने प्रवाशांच्या डोक्यावर पडता पडता वाचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे उंचावर आणि असुरक्षित पद्धतीने बॅनर लावले जात असतील, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सुदैवाने यावेळी मोठी दुर्घटना टळली; मात्र प्रत्येक वेळी नागरिकांचे प्राण थोडक्यातच बचावतील, याची काय खात्री? बसस्थानकासमोर दररोज प्रवाशांची वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणी बॅनर लावताना आवश्यक परवानगी, सुरक्षिततेचे निकष आणि संबंधित नियमांचे पालन केले जाते का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. विनापरवाना बॅनर लावले असल्यास त्यावर कारवाई कोण करणार? बॅनर कोसळून एखाद्या प्रवाशाला गंभीर दुखापत झाली किंवा जीव गेला, तर त्याची जबाबदारी जाहिरात लावणारा घेणार, बॅनर लावणारा घेणार की संबंधित प्रशासन? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने स्पष्ट करावीत. सार्वजनिक रस्ते आणि बसस्थानक परिसर कोणाच्या मनमानी जाहिरातींसाठी नाहीत. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी प्रकारांना वेळीच आळा घालून धोकादायक बॅनर तातडीने हटवावेत, तसेच संबंधित बॅनरला परवानगी कोणी दिली याची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. आज दुर्घटना टळली म्हणून प्रशासनाने गाफील राहू नये; उद्या एखाद्याचा जीव गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा आजच कारवाई करा!






