spot_img
spot_img
spot_img
spot_img

कृषी, उद्योग, आरोग्य आणि विकासाच्या विविध क्षेत्रात बुलढाण्याची दमदार वाटचाल — पालकमंत्री ना. मकरंद पाटील

बुलढाणा : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्याने कृषी, शेतकरी कल्याण, उद्योग, कौशल्य विकास, आरोग्य, सामाजिक न्याय, क्रीडा, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रभावीपणे काम करीत आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरा, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, युवक ही डिजिटल भारताची मोठी शक्ती असून त्यांच्या नवकल्पना, कौशल्य आणि ऊर्जेतून विकसित महाराष्ट्र घडविण्याची क्षमता आहे. जिल्ह्यात यंदा ४०५.५० मिमी पाऊस झाला असून खरीप हंगामात ७ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर ९६.४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा आधार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ११ हजार ६२ लाभार्थ्यांना ३६ कोटी ८२ लाख रुपये, तर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून १० हजार ८६४ लाभार्थ्यांना १७ कोटी ७९ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून १३३ प्रकरणांना २ कोटी ६२ लाख रुपयांची मदत देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ७७ हजार शेतकऱ्यांना शेतीपिके व जमीन नुकसानीपोटी ४५५ कोटी ९८ लाख रुपयांची मदत थेट खात्यावर जमा करण्यात आली आहे. खरीप २०२४-२५ मध्ये ५ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना ७१४ कोटी रुपयांची पीक विमा नुकसानभरपाई मिळाली आहे. तसेच सुमारे २ लाख २७ हजार ६४६ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. उद्योग व रोजगाराला चालना ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ संकल्पनेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत ९७५ प्रस्तावांना ३२ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून १ हजार १२० रोजगारांची निर्मिती केली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत २२ हजार ३६४ उमेदवारांनी नोंदणी केली असून ५ हजार ३०७ युवकांना रोजगार मिळाला आहे. आरोग्य, शिक्षण व सामाजिक न्यायाला प्राधान्य ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून ग्रामस्तरावर आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माता-बाल आरोग्य, लसीकरण, मुलींचे संरक्षण तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि निवासी शाळांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरां’मधून जिल्ह्यातील ३३ हजार ६७४ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ व साहित्याचे वितरण करण्यात आले. पर्यावरण व पर्यटन विकासावर भर बुलढाणा जिल्ह्यासाठी दरवर्षी १० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लोणार सरोवर, शेगाव आणि सिंदखेड राजा यांसारख्या पर्यटनस्थळांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी असून सुमारे ४४ हजार खेळाडू विविध क्रीडा उपक्रमांत सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील १२ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून बुलढाण्याचा गौरव वाढविला आहे. ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त राज्यभर ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, कौशल्य विकास आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत बुलढाणा जिल्हा विकासाची नवी वाट निर्माण करीत आहे. विकसित, समृद्ध, आत्मनिर्भर आणि सक्षम भारत घडविण्याचा निर्धार करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.यावेळी उल्लेखनीय कार्य करणारे पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्कृष्ट ग्रामपंचायती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!