Buldhana Update / लोणार : प्रभाकंवरजी मारासा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उत्साहात आयोजन; सकल जैन समाजाचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र प्रवर्तिनी, ज्ञानगंगोत्री प.पू. श्री प्रभाकंवरजी मारासा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच चातुर्मासाच्या प्रारंभानिमित्त लोणार येथील वर्धमान स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने आठ दिवसांचे निरंकार उपवास करणाऱ्या १६ तपस्वींचा भव्य वरघोडा मोठ्या उत्साहात काढण्यात आला. गेलडा भवन येथे विराजमान असलेल्या पैसठिया जाप आराधिका, मधुर व्याख्यानी, सरलस्वभावी प.पू. श्री किरणसुधाजी मारासा, तेलातप आराधिका महातपस्वी प.पू. श्री विशालाजी मारासा आदी ठाणा ५ यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडला. सकाळी ९ वाजता गेलडा भवन येथून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. सराफा बाजार, मशीद चौक, बस स्टँड चौक मार्गे सजवलेल्या रथामध्ये तपस्वींना विराजमान करून वरघोडा श्री मंगल कार्यालय येथे पोहोचला. त्यानंतर धर्मसभेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्याला प.पू. किरणसुधाजी म.सा., प.पू. विशालप्रभाजी म.सा., प.पू. श्री सुयशप्रज्ञाजी म.सा. आणि प.पू. सौम्यप्रज्ञाजी म.सा. यांची पावन उपस्थिती लाभली. साध्वी भगवंतांनी उपस्थित समाजबांधवांना प.पू. प्रभाकंवरजी मारासा यांच्या जीवनकार्याची तसेच तपसाधनेचे महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाची माहिती दिली. यावेळी आठ दिवसांचे निरंकार उपवास करणाऱ्या सौ. सपना रोशन गेलडा, कु. विरती आशिष, डॉ. सिद्धार्थ विजय बेदमुथा, सौ. कोमल ऋषभ गेलडा, जिनेंद्र नवलचंद चोरडिया, ऋषभ पारसमल कोठारी, कु. पायल ललितजी लोढा, सौ. मानसी ऋषभ कोठारी, सौ. जया प्रवीण कोचेटा, सौ. अनिता नवलचंदजी चोरडिया, सौ. सुरेखा सुरेशचंद बेदमुथा, सिद्धम रोशन गेलडा, सौ. आरती छाजेड, आयुष शरद लुनिया आणि गौरव संदीप कुचेरीया यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार प्रतापरावजी जाधव, माजी आमदार डॉ. संजयजी रायमुलकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीरामजी मापारी यांच्या हस्ते शिवसेनेचे नगरसेवक मयुर गोलेच्छा मित्र मंडळाच्या वतीने तपस्वींसाठी आणलेल्या सामाईक किटचे वितरण करण्यात आले. या जन्मशताब्दी महोत्सवाला नांदेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, मेहकरचे माजी आमदार संजयजी रायमुलकर, मेहकर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष जयचंदजी भाटिया, लोणारच्या नगराध्यक्ष सौ. मीराताई भूषण मापारी, नगरसेवक भूषण मापारी, काँग्रेस नेते नितीन शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. लोणार शहरासह बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून सकल जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. जैन धर्मात तपसाधनेला विशेष महत्त्व असून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत १६ समाजबांधवांनी आठ दिवस निरंकार उपवास करून कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे हा सोहळा धार्मिक श्रद्धा, संयम आणि सामूहिक भक्तीचा अनोखा संगम ठरला. पोस्टल तिकिटासाठी निवेदन प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या छायाचित्राचे पोस्टल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आली. याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. जीनेश्वर युवा ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीनेश्वर युवा ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.





