चौकशी अहवालानंतरही कारवाई रखडली; तक्रारदाराची पालकमंत्र्यांकडे धाव, प्रशासनावर पाठराखणीचा आरोप
Buldhana Update / डोणगाव : येथील इंडियन ग्रामीण वितरक गॅस एजन्सीच्या गैरकारभाराबाबत जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या चौकशीत एजन्सी दोषी आढळूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदार अमोल वसंत धोटे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी १४ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. मकरंद पाटील यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ११ मे २०२६ रोजी तहसीलदार मेहकर आणि २० मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा यांच्याकडे गॅस एजन्सीच्या कथित गैरप्रकाराबाबत तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी पथक नियुक्त केले. या पथकाने १५ जून २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालात संबंधित एजन्सी दोषी आढळल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. पाठपुरावा करूनही कारवाई नाही चौकशी अहवालानंतर तक्रारदाराने २४ जून रोजी इंडियन ऑइलच्या संभाजीनगर विभागीय कार्यालयाकडे, तर ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली. मात्र, अहवालात दोष आढळूनही संबंधित एजन्सीवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.दरम्यान, १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्ट रोजी पालकमंत्री मकरंद पाटील बुलढाणा जिल्ह्यात आढावा बैठका व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर अमोल धोटे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत तक्रार सादर केली असून, दोषी आढळलेल्या एजन्सीचा परवाना रद्द करावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी केली आहे.तसेच प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही तक्रारदाराने दिला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी संबंधित एजन्सीची पाठराखण करत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. आता पालकमंत्री या तक्रारीची कितपत गंभीर दखल घेतात आणि संबंधित प्रशासनाला कोणते निर्देश देतात, याकडे डोणगावसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





