spot_img
spot_img
spot_img
spot_img

खळेगाव–खळेगावफाटा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; दोन वर्षांतच डांबर गायब!

बुलढाणा : लोणार तालुक्यातील खळेगाव–खळेगावफाटा या महत्त्वाच्या मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली असून, अवघ्या दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आलेल्या सुमारे दोन किलोमीटरच्या रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील तब्बल मोठा भाग डांबरविरहित झाल्याने या कामाच्या दर्जावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा मार्ग महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून जागदारी, कंडारी, भंडारी यासह परिसरातील नागरिकांसाठी मेहकर, जालना तसेच इतर ठिकाणी जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असताना खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षांत रस्ता उद्ध्वस्त; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न विशेष म्हणजे या रस्त्याचे नूतनीकरण अवघ्या दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र इतक्या कमी कालावधीत रस्त्याची झालेली अवस्था पाहता नूतनीकरणाच्या कामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाच्या देखरेखीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन वर्षांत रस्ता खड्ड्यात गेला असेल, तर जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. खड्डे बुजविण्याऐवजी चक्क चऱ्या खोदल्या! रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार तसेच लहान वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र रस्ता दुरुस्ती करून खड्डे बुजविण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला चऱ्या खोदून खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी नाल्यात वळविण्याचा उपाय केला आहे. रस्ता खड्डेमुक्त करण्याऐवजी खड्ड्यातील पाणी काढणे, हा नेमका कोणता ‘दुरुस्तीचा’ प्रकार? असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी या मार्गाची तातडीने पाहणी करून निकृष्ट झालेल्या रस्त्याची शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी खळेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेतली नाही, तर या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.दोन वर्षांत रस्ता खड्ड्यात आणि आता खड्ड्यातील पाणी काढण्यासाठी चऱ्या—सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारभारामुळे नागरिकांच्या संतापाचा बांध फुटण्याची वेळ आली आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!