Buldhana Update / मलकापूर (प्रतिनिधी): देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मलकापूर येथे वृक्ष लागवड, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ‘श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान’ आणि ‘भातृ मंडळ, मलकापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवण्यात आले. वृक्ष दिंडी सोहळा स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान येथून भव्य ‘वृक्ष दिंडी सोहळ्या’स सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दिंडीचा सांगता समारोप सायंकाळी ६:०० वाजता भ्रातृ मंडळ, मलकापूर येथे करण्यात आला. जागर राष्ट्रभक्तीचा’ संगीतमय कार्यक्रम दिंडीच्या समारोपानंतर सायंकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पार पडले. देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित गीतांचा हा बहारदार कार्यक्रम ‘स्वरमाला मेलोडीज, अकोला’च्या कलाकारांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची अनुपस्थिती या सोहळ्याचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आणि अध्यक्षस्थान बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेशजी तांबे (IPS) यांच्या उपस्थितीत नियोजित होते. मात्र, बुलढाणा येथे पालकमंत्री यांच्या शासकीय कार्यक्रमात दोघांचीही उपस्थिती अनिवार्य असल्याने, शासकीय कामकाजानिमित्त ते मलकापूर येथील या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमास तालुक्यातील ॲड.साहेबराव मोरे, ॲड हरीष रावळ,अनिल गांधी, संतोष रायपुरे,शिवचंद्र तायडे डॉ. अरविंद कोलते, दामोधर शर्मा, ज्ञानदेव हिवाळे, विशाल दवे, सुरेश शर्मा,रिटायर मेजर सर्व, आशाताई फरतोडे,मंगलाताई पाटील, सर्व पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र, देशप्रेमी नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आयोजनाच्या यशस्वीतेसाठी ‘श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान’ आणि ‘भातृ मंडळ, मलकापूर’च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





