दोषींवर कारवाई झाली नाही तर आझाद मैदानापर्यंत आंदोलन करू; श्री १०५ ऐलक सिद्धांत सागर महाराजांचा इशारा
पीएसआय विजय अजमीरे यांचे तातडीने वरिष्ठांकडे निवेदन पाठविण्याचे आश्वासन
डोणगाव : शिरपूर (जैन), ता. मालेगाव, जि. वाशिम येथील बस्ती मंदिरातील वेदी क्रमांक २ मधील भगवान मुनिसुव्रतनाथ स्वामींची मूर्ती दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी तोडून खंडित केल्याची घटना समोर आल्याने सकल दिगंबर जैन समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. या घटनेचा डोणगाव येथील सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी समाजाच्या वतीने डोणगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी श्री १०५ ऐलक सिद्धांत सागर महाराज यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत, “दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही आमचे आंदोलन केवळ डोणगाव पोलीस स्टेशनपर्यंत मर्यादित ठेवणार नाही. आम्ही आझाद मैदानापर्यंत जाऊन आंदोलन करू आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली. दरम्यान, निवेदन स्वीकारताना डोणगाव पोलीस ठाण्याचे पीएसआय विजय अजमीरे यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात येईल तसेच समाजाने दिलेले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणाबाबत पुढील कार्यवाहीची माहिती समाजाच्या प्रतिनिधींना कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. “कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,” अशी भूमिका पीएसआय अजमीरे यांनी यावेळी स्पष्ट केली. धार्मिक स्थळातील आराध्य देवतेची मूर्ती खंडित झाल्याने समाजाच्या भावना दुखावल्या असून, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल दिगंबर जैन समाजाने केली आहे.






