Buldhana Update / देऊळगाव राजा : सावखेड भोई येथे घराबाहेर फोनवर बोलत असलेल्या २१ वर्षीय तरुणाला ‘माझ्याकडे पाहून का हसलास?’ या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर रमेश वाघमारे (वय २१, रा. सावखेड भोई) हा घराबाहेर फोनवर बोलत असताना आरोपी शिवाजी वसंता वाघमारे याने त्याला ‘तू माझ्याकडे पाहून का हसलास?’ असे म्हणत लोखंडी रॉडने डोक्याच्या मागील बाजूस तसेच डाव्या हाताच्या दंडावर मारहाण केली. या मारहाणीत शंकर वाघमारे जखमी झाला.
यावेळी आरोपीने शिवीगाळ करून ‘तुला एखाद्या दिवशी जीवाने मारून टाकीन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. जखमी तरुणाने घटनेनंतर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीचा तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी कलम 118(1), 352, 351(2), 351(3) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये कायमी अप क्रमांक 378/2026 दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत. या प्रकरणात ई-साक्ष नोंदविण्यात आली आहे.





