देऊळगाव राजा : वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत पैशांची मागणी करून मारहाण व शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय मुस्कानबी मोहम्मद अरबाज यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद अरबाज मोहम्मद इसाक, जरिना मोहम्मद इसाक, मुफ्रीदा मोहम्मद इसाक, नुरजहा मोहम्मद इसाक व मुशाइरा मोहम्मद इसाक (सर्व रा. सरकारी दवाखान्याजवळ, चिखली) यांनी फिर्यादीस वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत पैशांची मागणी केली. तसेच मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादीने याबाबत ४ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलडाणा येथे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून २० ऑगस्ट रोजी आदेश देण्यात आले. त्यानुसार संबंधित पत्र ४ सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात प्राप्त झाले. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 85, 115(2), 352, 351(2), 351(3) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान गिते करीत आहेत.






