Buldhana update/crime स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; साखरखेर्ड्यात १८.२१ लाखांचा गुटखा पकडला
साखरखेर्डा, दि. १७ जून : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) बुलढाणा व साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तब्बल १८ लाख २१ हजार ९२१ रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून दोन आरोपी फरार आहेत.पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तथा अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव विभाग) श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या आदेशानुसार ही कारवाई बुधवार (दि. १७) रोजी करण्यात आली.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), २७(३)(e), ३(१)(zz)(iv) व ५९ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपी शेख इम्रान शेख चांद व शेख मुस्ताक शेख, दोघेही रा. साखरखेर्डा, हे सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.ही उल्लेखनीय कारवाई पीएसआय प्रताप बाजड, हेड कॉन्स्टेबल गजानन दराडे, शरद गिरी, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, युवराज राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मनोज खरडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल राजू आडवे, एपीआय करेवाड आणि अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपाळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठवणूक आणि विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.





