बसस्थानक चौकात खुलेआम जुगार; एकावर गुन्हा दाखल, ₹१,२४५चा मुद्देमाल जप्त
बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : देऊळगाव मही येथील बसस्थानक चौकात हॉटेल रजनीकांतसमोर सार्वजनिक ठिकाणी वरली-मटका जुगाराचा डाव सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत सुभाष रतन कोठारी (वय ३०, रा. बसस्थानकाजवळ, देऊळगाव मही) याला पकडले. त्याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी देऊळगाव मही बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना सार्वजनिक ठिकाणी पैसे घेऊन वरली-मटका जुगाराच्या चिठ्ठ्या दिल्या जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई केली. यावेळी सुभाष कोठारी याला जुगार चालविताना ताब्यात घेण्यात आले.कारवाईत त्याच्याकडून रोख ₹१,२४०, एक पेन आणि वरली-मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी, असा एकूण ₹१,२४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दिगंबर कपाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार कलीम शफी देशमुख करीत आहेत.आणखी कित्येक ठिकाणी हा वरली मटका सुरू असून त्यांना अभय कुणाचे हा प्रश्न सध्या देऊळगाव मही येथे चर्चेचा विषय ठरला आहे






