Buldhana Update / डोणगाव : मुलगा जन्माला आला की ढोल वाजवायचे आणि मुलगी झाली की शांतपणे आनंद साजरा करायचा, ही मानसिकता बदलण्याची गरज आजही समाजासमोर आहे. मात्र डोणगावातील धोंगडे कुटुंबाने या जुन्या मानसिकतेला छेद देत “मुलगी म्हणजे लक्ष्मी” हा विचार कृतीतून दाखवून दिला आहे.येथील प्रतिष्ठित व्यापारी राजूभाऊ धोंगडे यांच्या घरी लाडक्या नातीचे आगमन होताच संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. चिमुकलीच्या स्वागतासाठी घरापासून तब्बल एक किलोमीटर अंतरावरून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढ्यांचा गोडवा यामुळे डोणगावातील वातावरण अक्षरशः आनंदमय झाले. नातीच्या स्वागतासाठी रस्त्यावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या. औक्षण करून चिमुकलीचे घरात स्वागत करण्यात आले. आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांतील समाधान हा संपूर्ण सोहळ्याचा सर्वात भावनिक क्षण ठरला. “नात म्हणजे घरची लक्ष्मी. तिच्या आगमनाने आमच्या घरात खरी लक्ष्मी आली आहे. तिच्या जन्माचा आनंद आम्हाला मनापासून साजरा करायचा होता,” अशी भावनिक प्रतिक्रिया राजूभाऊ धोंगडे यांनी व्यक्त केली.धोंगडे कुटुंबाने केलेल्या या स्वागताने केवळ एका चिमुकलीच्या आगमनाचा आनंद साजरा झाला नाही, तर मुलगा-मुलगी समानतेचा अत्यंत सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचला. मुलीच्या जन्माकडे ओझे म्हणून नव्हे, तर कुटुंबाच्या सौभाग्याचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून पाहण्याची प्रेरणा या सोहळ्यातून मिळाली.ढोल-ताशांचा गजर थांबला, फटाक्यांचा आवाजही शांत झाला; मात्र या चिमुकलीच्या स्वागताने दिलेला ‘मुलगी म्हणजे लक्ष्मी’ हा संदेश मात्र डोणगावच्या मनामनात घुमत राहिला.या आगळ्यावेगळ्या स्वागताची परिसरात जोरदार चर्चा असून, धोंगडे कुटुंबाच्या या संवेदनशील आणि समाजाला दिशा देणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





