Buldhana Update / सिंदखेड राजा : नागपंचमीच्या दिवशी महिला वारुळाची पूजा-अर्चना करतात तसेच पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. ठिकठिकाणी नागदेवतांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. पुरातन संस्कृती आणि परंपरा आजही त्याच श्रद्धेने नवीन पिढीकडून जतन करण्याचे काम सुरू आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे १७ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या सणानिमित्त शामगिर बाबा संस्थेच्या सभागृहात बारी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागपंचमीच्या सणाला बारी भजन म्हणण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असून आजही ही परंपरा कायम आहे.सकाळी शंभर बाबांच्या मठामध्ये नागांच्या प्रतिमेसमोर गुलाल नारळ अगरबत्ती आणि इतर पूजेचे साहित्य ठेवून पूजा करण्यात आली. त्यानंतर तांब्याच्या भांड्यावर कडीच्या साहाय्याने वाद्य वाजवून अतिशय सुंदर पद्धतीने बारी भजन सादर करण्यात आले. हे भजन ऐकण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम असल्याने पुरातन संस्कृतीचे जतन होत असल्याचे दिसून आले. या बारी भजन कार्यक्रमास काशिनाथ बुरुकूल अनंता भालेकर यशवंता खंडारे आश्रुबा गवई सखाराम खंडागळे बबन चांदोरे गजानन शेषराव बंगाळे शेषराव बेलोडे शिवाजी खरात उमेश बंगाळे वसंता बंगाळे परसराम बंगाळे अनिल बंगाळे संतोष कंकाळ श्रीकांत गावडे समाधान खरात मनोज काकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





