लोणार | प्रतिनिधी डॉ अनिल मापारी | दि. २४ मे २०२६ जन्मप्रमाणपत्र काढण्यासाठी शासनाने अलीकडे लागू केलेल्या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करून प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगर परिषद गटनेते तथा नगरसेवक मयुर गोलेच्छा यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्याकडे तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.सध्या जन्मप्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना आधीच दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असताना नव्या नियमांमुळे ही प्रक्रिया अधिकच क्लिष्ट झाली आहे. त्यामुळे आता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. शासनाने नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची केल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जन्मप्रमाणपत्र हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असून शाळा प्रवेश, शासकीय योजना, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट तसेच इतर विविध कागदपत्रांसाठी ते आवश्यक असते. मात्र नव्या नियमांनुसार जन्मप्रमाणपत्र मिळविण्यासाठी तब्बल २० प्रकारच्या कागदपत्रांची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालयाच्या नोंदी, लसीकरण पुरावे, आई-वडिलांचे जन्मप्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, रहिवासी पुरावे, शाळेचे दाखले, मालमत्ता कर पावत्या, सातबारा उतारा, बँक पासबुक, मतदान कार्ड, वाहन परवाना, शपथपत्र तसेच स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींच्या साक्षीदार स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे.ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे ही सर्व कागदपत्रे उपलब्ध नसतात. अनेक वेळा जुनी कागदपत्रे हरवलेली असतात किंवा विविध कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारूनही आवश्यक पुरावे मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः शेतकरी, मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही प्रक्रिया अधिक त्रासदायक ठरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.मयुर गोलेच्छा यांनी सांगितले की, अनेक नागरिकांकडे स्वतःचे किंवा त्यांच्या पालकांचे जन्मप्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजनांचा लाभ तसेच इतर महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. जन्मप्रमाणपत्र मिळवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची मागणी करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच जन्मप्रमाणपत्र, मृत्यू दाखला आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे काम वेगवेगळ्या विभागांकडे असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही सर्व प्रमाणपत्रे नगरपालिका प्रशासनामार्फत ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.निवेदनामध्ये जन्मप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मोजक्या आवश्यक कागदपत्रांच्या आधारे ठराविक कालावधीत प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी तसेच ग्रामीण भागात विशेष शिबिरे घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, नव्या नियमांविरोधात नागरिकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “जन्मप्रमाणपत्र काढण्यासाठीच इतकी कागदपत्रे मागितली जात असतील तर सामान्य माणसाने न्याय कुठे मागायचा?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन नियमांमध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.तहसीलदार भूषण पाटील यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागणी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल तसेच नागरिकांच्या अडचणींबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असे आश्वासन दिले.
जन्मप्रमाणपत्र प्रक्रियेतील नव्या नियमांमुळे वाढली नागरिकांची धावपळ
जन्मप्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्यातच नागरिकांचा मोठा वेळ खर्ची पडत असून, शासन निर्णयात नमूद केलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध नसल्यास प्रमाणपत्र मिळणे कठीण होणार असल्याची माहिती तहसीलदार भूषण पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे २०२१ पूर्वी नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या अनेक जन्मप्रमाणपत्रांना नव्या शासन निर्णयानुसार अमान्य ठरविण्यात आल्याने नागरिकांना पुन्हा नव्याने जन्मनोंदणी प्रक्रिया करावी लागणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून मानसिक व आर्थिक त्रास वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
▪️ प्रतिक्रिया ▪️“जन्मप्रमाणपत्र, मृत्यू दाखला आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वेगवेगळ्या विभागांकडे असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही सर्व प्रक्रिया नगरपालिका स्तरावर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचेल.”— मयुर गोलेच्छा, नगरसेवक तथा शिवसेना गटनेते, नगर परिषद लोणार





