Buldhana update : डोणगाव परिसरातील काच नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नदीपात्राची पाण्याची वहन क्षमता कमी झाली असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नदीतील गाळ उपसा करून शिवार जलयुक्त करावे व भविष्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी डोणगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार मेहकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे काच नदीला आलेल्या पुरामुळे गावातील सुमारे २०० घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळित होत असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे.नदीतील गाळ काढून तो शेतांमध्ये टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल, पाणी साठवण्याची क्षमता वाढेल तसेच शिवार जलयुक्त होण्यास मदत होईल. त्यामुळे हे काम मनरेगा किंवा शासनाच्या संबंधित योजनेंतर्गत तातडीने करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी देऊन संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती करून काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, जेणेकरून आगामी पावसाळ्यात पूरस्थिती टाळता येईल व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.यावेळी उत्तमराव परमाळे, मधुकरराव घिरके, विजय पांडव, राहुल शिंगणे, अरविंद परमाळे , भगवत पांडव, सचिन मानवतकर, विशाल मानवतकर, रुपेश परमाळे आदी शेतकरी उपस्थित होते.





