डोणगाव : संताजी महाराज सेवाभावी ट्रस्ट, डोणगाव यांच्या वतीने डोणगाव येथे उभारण्यात आलेल्या भव्य व आकर्षक शनीदेव महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे ११ क्विंटल पोळी-भाजी व बुंदीचे लाडू यांचा महाप्रसाद नागरिकांना वितरित करण्यात आला. महिलामंडळाच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले असून शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
डोणगाव येथे महाराष्ट्रातील सर्वात उंच व आकर्षक अशा शनीदेव महाराजांच्या मूर्तीची गेल्या वर्षी विधिवत पूजा-अर्चा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महिलामंडळाच्या सदस्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रसाद वाटपाची जबाबदारी सांभाळली. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताजी महाराज सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष विनोद प्रभाकर बोंडगे, ट्रस्टचे पदाधिकारी, महिलामंडळाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले





