मंत्रालयाला पोलिसांचा वेढा; शेतकरी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू!
Buldhana update / मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुंबईत आंदोलनाचा एल्गार सुरू असतानाच प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसी ताकद पणाला लावली आहे. मंत्रालय परिसराला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांची संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी मंत्रालय परिसरातील झाडांभोवतीही पोलिसांचा पहारा ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मुंबईत धरपकड सुरू झाली असून, संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनाही आकाशवाणी आमदार निवास परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलनासाठी जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे. धरपकडीने आंदोलन थांबणार? कार्यकर्त्यांचा सवाल!शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करून आंदोलनाची धार बोथट करता येईल का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलिसांची कारवाई कितीही वाढली तरी शेतकऱ्यांचा संघर्ष मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.मुंबईत आलेल्या शेतकरी कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी अडविणे, ताब्यात घेणे आणि आंदोलनस्थळी पोहोचण्यापासून रोखण्याच्या हालचालींमुळे प्रशासन आणि आंदोलनकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तुपकर कुठे? पुढचा डाव काय? या संपूर्ण घडामोडींमध्ये आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व करणारे रविकांत तुपकर कुठे आहेत, हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असताना तुपकरांची पुढील भूमिका आणि आंदोलनाची दिशा काय असणार, याकडे राज्यातील शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मंत्रालया भोवती पोलिसांचा वेढा, कार्यकर्त्यांची धरपकड आणि दुसरीकडे शेतकरी प्रश्नांवरून वाढता आक्रोश यामुळे मुंबईतील आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतल्याचे चित्र आहे. पोलिसी कारवाईने शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार की धरपकडीच्या या कारवाईमुळे आंदोलनाची ठिणगी आणखी भडकणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.डॉ. टाले यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





