काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत
बुलढाणा अपडेट / राजगड : आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याचा सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना मेहकर तालुक्यातील राजगड (पो. विश्वी) येथे घडली आहे. राज अभिषेक राठोड (वय ५ वर्ष) असे या मृत बालकाचे नाव आहे. मध्यरात्री गावात वीज नसल्यामुळे नेमका कशाने चावा घेतला हे ओळखण्यात चूक झाली आणि उपचारास उशीर झाल्याने या चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.मध्यरात्री काळ बनून आला साप राजगड येथील रहिवासी असलेला पाच वर्षीय राज राठोड हा नेहमीप्रमाणे रात्री आपल्या आईच्या कुशीत झोपला होता. मध्यरात्री सव्वा दोन (२:१५) वाजताच्या सुमारास एका अत्यंत विषारी सापाने त्याच्या पायाला जोरात दंश केला. सापाने चावा घेताच राजला तीव्र वेदनेमुळे अचानक जाग आली. तो वेदनेने विव्हळत आणि रडत रडत उठला व त्याने आपल्या आईला जागे केले.वीज नसल्याने घात झाला!मुलाचे रडणे ऐकून आई तात्काळ जागी झाली. मात्र, दुर्दैवाने त्या वेळी गावातील विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. सर्वत्र गडद अंधार असल्यामुळे आईने टॉर्च आणि मोबाईलच्या प्रकाशात आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधारामुळे त्यांना तिथे काहीच दिसले नाही. रात्रीची वेळ असल्याने मुलाला कदाचित उंदराने चावा घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आईने बांधला.दरम्यान, मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मागे काही नातेवाईकांनी घरात पुन्हा एकदा नीट शोधाशोध केली. अखेर राज ज्या गोधडीवर झोपला होता, ती गोधडी उचलली असता, त्याच गोधडीखाली तो विषारी साप लपून बसलेला आढळून आला.उपचारास उशीर अन घात झाला…सापाच्या अत्यंत तीव्र विषामुळे राजची प्रकृती झपाट्याने खालावू लागली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला उंदराने नव्हे तर सापानेच दंश केल्याचे स्पष्ट केले. मात्र, सर्पदंश झाल्यापासून रुग्णालयात पोहोचेपर्यंत आणि नेमका प्रकार समजेपर्यंत खूप मोठा वेळ निघून गेला होता. विष संपूर्ण शरीरात पसरल्यामुळे डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपुरे पडले आणि त्यांनी राजला मृत घोषित केले.आईच्या कुशीत सुरक्षित असलेल्या चिमुरड्याचा अशा प्रकारे काळ बनून आलेल्या सापाने घात केल्यामुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच रात्रीच्या वेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे एका निष्पापाचा बळी गेल्याने गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.





