डोणगाव (बुलढाणा अपडेट / सुबोध आखाडे) :– बुद्धिमत्ता व स्मरणशक्तीच्या जोरावर अवघ्या २ वर्षे ८ महिने वयात डोणगावच्या चिमुकल्याने देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.
चि. क्षितिज विशाल बाजड या बालप्रतिभेने जगातील तब्बल ७२ देशांच्या राजधानींची नावे केवळ २ मिनिटे ३० सेकंदांत सांगून आपले नाव थेट ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
क्षितिजची आई सौ. सोनाली बाजड व वडील विशाल बाजड यांनी त्याच्यातील हुशारपणा अगदी लहान वयात ओळखला. खेळाच्या वयातही रटाळ अभ्यास न लावता, रंजक पद्धतीने माहिती देत त्याला शिकवण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे क्षितिजने काही दिवसांतच हा कठीण टप्पा यशस्वीरित्या पार केला.
या यशामुळे डोणगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
सोशल मीडियावर क्षितिजच्या यशाचे व्हिडीओ व्हायरल होत असून, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्याच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे अनेकजण क्षितिजला आजच ‘भविष्यातील गुगल बॉय’ म्हणू लागले आहेत. ज्या वयात मुले नीट बोलूही शकत नाहीत, त्या वयात जगाचा नकाशा आणि विविध देशांच्या राजधानी त्याच्या तोंडपाठ असणे हे सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरत आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून क्षितिजला अधिकृत प्रमाणपत्र, मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
क्षितिजच्या या विलक्षण प्रतिभेमुळे त्याचे उज्ज्वल भविष्य निश्चित असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.





