डोणगाव , परिसरातील डोणगाव–शेलगाव रस्त्याच्या उर्वरित तीन किलोमीटर कामाला मुख्यमंत्री बळीराजा पांढण रस्ता योजनेअंतर्गत तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी बुलढाणा जिल्हा भा.रा. काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सुबोध सावजी यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. डोणगाव शेलगाव रस्त्यावर गणेश शिवाजी इंगळे यांच्या शेतापासून कन्हाळवाडी नाल्याजवळील श्याम अशोक खोटे यांच्या शेतापर्यंत सुमारे चार किलोमीटर लांबीचा रस्ता असून, यापैकी एक किलोमीटर रस्त्याला मातोश्री पांढण रस्ता योजनेतून मंजुरी मिळालेली आहे. मात्र उर्वरित तीन किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप प्रलंबित असून, या रस्त्यावर २०१९ मध्ये लोकसहभागातून माती भरावाचे काम पूर्ण झालेले आहे. या रस्त्याबाबत प्रस्ताव तहसील कार्यालय मेहकरमार्फत यापूर्वीच सादर करण्यात आला असून, शासनस्तरावर मंजुरी देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता तातडीने मंजूर करून काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रशांत तुपाडे, गजानन परमाळे, एकनाथ परमाळे, गोविंदा परमाळे, दत्ता पांडव, माणिक परमाळे, रामदास परमाळे, राजू पादरे, संजय फुले, संदीप परमाळे, प्रदीप परमाळे, गोपाल काळे, त्रंबक मोरे व नारायण भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.





