डोणगाव : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून महिलांवर अमानुष मारहाण झाल्याची संतापजनक घटना २० फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. या घटनेच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमी समाजाच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी डोणगाव शहर बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविला. नागरिक, शेतकरी व युवकांनीही बंदला सक्रिय सहकार्य केले. शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद दिसून आली. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
चिखला येथे शिवस्मारकाच्या वादातून निर्माण झालेल्या तणावाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले होते. या घटनेत मराठा समाजातील शिवकन्या संजीवनीताई वाघ यांच्यासह इतर महिलांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याची बाब समोर आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर घटनेतील मुख्य आरोपी व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस प्रशासनामार्फत सादर करण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत तसेच समाजात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, डोणगावमधील बंद शांततेत पार पडला असून नागरिकांच्या एकजुटीमुळे निषेधाला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.





