spot_img
spot_img
spot_img
spot_img

“मी आमदार असतो तर जेसीबी खाली झोपलो असतो!” – सुबोध भाऊ सावजींचा खरातांना थेट जाब

बुलढाणा अपडेट/डोणगाव, दि. २० फेब्रुवारी : मेहकर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी मंत्री तथा रोखठोक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे सुबोध भाऊ सावजी यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कार्यालयात धडक देत विविध समस्यांवर थेट जाब विचारला.

“मी येथे माजी मंत्री म्हणून नव्हे, तर एक मतदार म्हणून आलो आहे,” असे स्पष्ट करत सावजी यांनी मतदारसंघातील वाढत्या अडचणींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी वीज कंपनीचे हायपॉवर टॉवर कापले, त्यावेळी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले; मात्र शेतकरी व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी मी सदैव लढलो. मेहकर शहरात अतिक्रमण पाडले जात असताना जर मी आमदार असतो, तर जेसीबीसमोर झोपून गोरगरिबांचे अतिक्रमण वाचविले असते,” असे ठाम विधान त्यांनी केले.

पाणी, रस्ते, अतिक्रमण आणि कर्जमाफीचे प्रश्न

यावेळी सावजी यांनी मेहकर मतदारसंघातील विविध प्रश्न उपस्थित केले. पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या असल्या तरी गावागावांत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन उभारूनही प्रत्यक्षात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था, अतिक्रमित जागांवरील ‘आठ अ’ नोंदींमध्ये सरकारी शब्द आल्यामुळे नागरिकांना घरकुल व इतर योजनांचा लाभ मिळत नसल्याची समस्या, तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जानेफळ-लोणी गवळी मार्गे विश्ववीकडे सिमेंट रस्ता होत असताना अत्यंत महत्त्वाचा मेहकर-डोणगाव मार्ग सिमेंटचा व रुंदीकरण का होत नाही, असा थेट सवालही त्यांनी केला.

“वेळ द्या, प्रयत्न सुरू आहेत” – खरात

यावर उत्तर देताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की, “मला आमदार म्हणून जेमतेम एक वर्ष झाले आहे. बहुतांश समस्या जुन्याच आहेत. मी विरोधी पक्षाचा आमदार असल्याने निधी आणताना काही अडचणी येतात. मात्र सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. मला थोडा वेळ द्यावा.”

या चर्चेदरम्यान शैलेश सावजी यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेहकर मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

दरम्यान, सावजी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मेहकर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

रोजा सोडण्याच्या काही क्षण आधीच काळाचा घाला; शेलगाव देशमुख येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

(बु.अ.प्र.) डोणगाव (अनिल राठोड): मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ६ मार्च रोजी सायंकाळी रोजा सोडण्याची तयारी सुरू असतानाच, एका...

काळाचा घाला: एका जीवघेण्या अपघातातून सावरले, पण दुसऱ्या अपघाताने शरद जाधव यांचा घेतला बळी

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव एका जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या भीषण अपघाताने एका व्यक्तीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना डोणगाव परिसरात घडली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!